साधकांची जशी प्रकृती, जशी रुची, जशी शक्ती, जशी अवस्था त्याप्रमाणे तो भापल्याला अनुकूल असा जो योगमार्ग त्याचा अवलंब करतो. योगयुक्त बुद्धीला धरून, एकान्तिक निष्ठेने साधना करीत रहातो व कृतार्थ बनतो
योगीराज गोरखनाथांनी योगसाधना प्रचलित करण्यासाठी आणि योगी-संप्रदाय प्रस्थापित करण्यासाठी, त्याच्या काही शाखा बनविल्या. भिन्न भिन्न स्थानांवर आश्रमांची स्थापना केली, शिक्षणाची केंद्रे स्थापन केली आणि आपल्या शिष्यांच्या द्वारे, त्यांनी समग्र भारतात योगधर्माच्या प्रसाराची व्यवस्था केली.
उदारचरित असे ज्ञानी लोक आणि योगी लोक, कोणत्याही देवतेच्या उपासनेची अवज्ञा करीत नसतात. ते सर्व देवदेवतांना प्रकृती पुरुषेश्वर, कल्याणगुणाकार भगवानाची त्रिभूतीच मानतात. ते असेही समजतात की, सर्व देवदेवतांच्या उपासनेने एकाच भगवानाची उपासना होते. तरीपण ते असेही पाहतात की, प्रधानतः महादेवाची, शिव- शंभूचीच उपासना केली जात आहे. शिवशंभो हा योगी लोकांचा आदर्श आहे. आणि तोच ज्ञानी लोकांचाही आदर्श आहे. शिवशंभो हे भगवती महामायेचे स्वामी आहेत, जे विश्वब्रह्मांडाचे अधिपती आहेत. तरीपण ते निर्लिप्त रहातात. उदासीन रहातात. आत्मसमाहित रहातात. ते मायेच्या विकाररूप दुनियेला संयमानेच टाळतात. ज्ञानाग्नीच्या सहाय्याने भस्मीभूत करतात. तेच भस्म आपल्या अंगाला चोपडतात. आणि साऱ्या विश्वाला आपल्यात प्रलीन करतात. आणि आत्मानंदात तल्लीन होऊन रहातात.