Wednesday 28 April 2021

अहं

मी, माझं हे शब्द म्हणजे या मार्गतले काटे आहेत. आज बरेच साधक या भ्रमात आहेत की मी हे केलं मी ते केलं किंवा माझ्यात ही शक्ती आहे माझ्यात ती शक्ती आहे.. हा मीपणा जो आहे तोच या मार्गावर चालणाऱ्यांसाठी एका अडथळ्याचं काम करतो. 

या जगात मी अस कोणी नाही, कर्ता करविता हा भगवंत आहे. जेव्हा तुम्हाला गुरूंदीक्षा मिळते तेव्हा तुम्ही तुमचे सर्व गुरूला समर्पित करता, थोडक्यात तुमच्या गाडीची चावी तुम्ही त्यांना देता. म्हणजे सर्व काही भगवंताकडून सद्गुरूच्या हाती देता. मग जर आपण सर्व त्यांना देतो तर मी करतो हा विषयच उरत नाही. 


 गुरू ब्रह्म दोन्ही समान हेही उपमा किंचित न्यून, गुरुवाक्ये ब्रह्मा ब्रह्मपण इतकी गुरूंची महती आहे. आपले जीवन विधिलिखित आहे आणि याचा लेखक म्हणजे विधाता सुद्धा गुरू शब्दापुढे जाऊ शकत नाही. 

जर तुमच्या अस्तित्वावरच तुमचा अधिकार नाही तर तुमच्या कृतीवर तुम्ही हक्क का सांगता? जे आहे ते विधीलिखित किंवा गुरू यांच्या हाती आहे. पण त्यातही गुरू हे काहीही झालं तरी आपल्या भोग कमी व्हावेत म्हणून शक्य ते सर्व करतात. भोगाची दाहकता कमी करतात. पूर्वजन्मसंचित पुण्याच्या फळाची गोडी वाढवतात तर पापाची तीव्रता कमी करतात. 

एकदा का साधक व्हायला सुरुवात झाली की आपोआप या माणसाला या गोष्टी समजायला लागतात. गुरू शिष्य नात हे विश्वासाच नात आहे. एकदम सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आपले संचित, भोग व गुरू हे नातं चहा आणि त्याची गाळणी सारख असत. ज्याप्रमाणे गाळल्यावर फक्त चहाच कपात येतो जर आलाच तर थोडासा संचित जे आपलाच भाग असत तेवढंच आपल्याला सहन करायचं असत. बाकी तर सर्व दुःख आणि भोग तर गाळून आलेले असतात. त्यातसुद्धा आपण मी आणि माझं करत असू तर ते जास्त हास्यास्पद आहे.

आपल्या गुरुप्रति असलेलं आपलं समर्पण हेच फक्त आपल्या हाती आहे ते जो जबाबदारीने करतो तोच सर्वांगीण प्रगती करतो म्हणजे गुरू त्याच्याकडून करून घेतात.. आपण या जगात काहीही घेऊन आलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही. मग आपले भाव सुद्धा योग्य ठिकाणी वापरणे हेच जीवन. 



आदेश
प्रसन्न संध्या प्रदीप कुलकर्णी 

Tuesday 27 April 2021

श्री महामारी स्तोत्रम्



 महाकालीमहन्नौमि महामारीस्वरूपिणीम्। रक्ष रक्ष जगन्मातस्त्वामेव शरणङ्गत:।।१।। त्वमेव शत्रुसंहन्त्री त्वमेव प्रलयेश्वरी। त्वामेव जगतां त्रात्रीं महामारीं नमाम्यहम्।।२।। त्वदर्भकस्त्वया त्रस्तस्त्वयैव रक्षितो मुहु:। दुष्ट दैत्य निहित्वं त्वां महामारीं नमाम्यहम्।।३।। यदा त्वं कुपिता मातस्तदा को रक्षको भवेत्। कारुण्यरूपिणीं देवीं महामारीं नमाम्यहम्।।४।। त्वमेवाम्ब महामाया त्वमेवासि क्षुधा तृषा। त्वमेव तुष्टि: पुष्टिस्त्वां महामारीं नमाम्यहम्।।५।। महामारीस्तोत्ररत्नं गङ्गाधरविनिर्मितम्। य: पठेच्छ्रद्धया नित्यं गृहे तस्य शुभं भवेत्।।६इति


संयम


कोणतीही गोष्ट असो, संयम महत्वाचा. आपली सेवा ही संयम वर आधारित असते. याच्या अनेक परीक्षा घेतल्या जातात.. अध्यात्मिक क्षेत्रात सर्वात जास्त घेतली जाणारी परीक्षा म्हणजे संयमाची असते. 

आपल्याला साधना सुरू केल्याकेल्या अनुभव यावेत आणि साधना सफल होऊन कार्यप्राप्ती व्हावी असे मनापासून वाटते पण ही अशक्य अशी गोष्ट आहे. बीज पेरल्यावर ते उगवायला वेळ लागतो त्याची योग्य काळजी घ्यावी लागते मग त्याचे फळ मिळते पण फळ मिळेपर्यंत ठेवावा लागतो तो संयम आणि विश्वास. साधनरुपी बीजाचे फळ मिळेपर्यंत आपण त्याचे नियमपालन करून काळजी घ्यावी मग मिळालेल्या सफलतेचा आनंद घ्यावा. जरी आपल्याला यश लवकर मिळाले तरी सद्गुरूंनी सांगितल्याशिवाय साधना थांबवू नये. 

संयम साधकाला परिपूर्ण बनवतो. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळणे व ती मिळून पण साधना पूर्ण करणे म्हणजे आपण योग्य मार्गावर आहोत असा आहे. *सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात कधीकधी नशीब आपल्यासाठी अजून चांगलं काहीतरी लिहीत असते फक्त ते येईपर्यंत आपल्याकडे संयम हवा.*
त्यामुळेच एखादी गोष्ट प्रयत्न करून नाही मिळाली म्हणजे आपले प्रयत्न वाया गेलेत अस न समजता ती मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे व संयम बाळगणे गरजेचे असते. आपण इथे आहोत याचा अर्थ आपल्या हातून काही महत्त्वाचे विधिलिखित घडणार आहे मग ती गोष्ट लहान असो की मोठी पण घडणार असतेच. पण त्याचा आपण त्रास करून न घेता  आपल्या साधनेवर लक्ष केंद्रित करावे. जे होईल ते होईल व जेव्हा होईल तेव्हा होईल. पण याचा अर्थ आळस करणे असा नाही तर प्रयत्न करणे असा घ्यावा. 
साधना दैवत प्रसन्न झाल्याचे संकेत मिळताच सद्गुरुंशी चर्चा करावी व आहे तशी ती सुरू ठेवावी. संयम हा कृतीतून दिसतो. भल्याभल्या अशक्यप्राय गोष्टी केवळ संयम ठेवल्याने साध्य होतात. त्याला प्रामाणिक प्रयत्नांची व विश्वासाची जोड हवी..
परिपूर्ण व परिपक्व साधक होण्यासाठी संयमची आवश्यकता असते. ज्या व्यक्तीजवळ  संयम समाधान व सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते...!

प्रसन्न संध्या प्रदीप कुलकर्णी

Saturday 24 April 2021

निराकार

गुरू हा निराकार असतो असे आपण म्हणतो,  म्हणजे काय हो ? तर निर म्हणजे पाणी म्हणजे गुरुचे स्थान हे पाण्यासारखे असते. म्हणजे कसे तर...

ज्याप्रमाणे तहान लागल्यावर पाण्याची गरज असते ज्ञानासाठी तहानलेल्या माणसाची तहान गुरुच भागवू शकतो.. 


ज्याप्रमाणे पाणी हे मार्गतले खड्डे किंवा अडथळे भरून पुढे जाते जाते त्याप्रमाणे गुरू सुद्धा आपल्या जीवनातील असंख्य अडथळे दूर करून आपला जीवनप्रवास सुखकर करतात.


पाण्याचे वाहणे हे मुक्त असते.. तसेच गुरुचे आपल्या आयुष्यातले स्थान असते.. त्याला सर्व गोष्टी व सर्व शिष्य समान असतात. फक्त मोकळेपणाने देणे हाच गुण त्यांच्या ठायी असतो.. गुरू वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रसंगी  आपल्याला रागावून आपल्या कडून आपल्यातले दोष सांगून किंवा दाखवून आपल्यातले दोष निवारण करतात ,आणि हे सर्व करत असतांना आपल्याला काय वाटेल त्याकडे ही त्यांचे लक्ष नसते

पाणी प्यायल्यावर जसे ते आपल्या शरीरात सामावून जाते तसेच गुरू आपल्यात सामावून आपल्यातले दोष निवारण करतात व बदल्यात त्यांना कसलीच अपेक्षा नसते केवळ आपल्या अडचणी दूर होऊन आपली ज्ञानाची तृष्णा भागवणे हेच त्यांचे कार्य.. 

जितके पाणी शुद्ध असते तितके ते चांगले असते तसेच आपला गुरू हा जितका शुद्ध विचारांचा असतो तितकेच आपले कर्तृत्व उजळ होत जाते. 

जल है तो कल है तसच गुरू आहेत तरच आपल्याला भविष्य आहे. अन्यथा जन्म वाया गेला अस समजावं.

ज्याप्रमाणे पृथ्वीवरचे सर्व प्यायचे ठरवले तर आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतील तसेच गुरुकडील सर्व विद्या शिकायला पण अनेक जन्म घेण्याशिवाय इतर उपाय नाही. 

पाणी म्हणजे निर प्रमाणेच गुरूंचे अवर्णनीय असेल अनेक गुण व आकार आहेत म्हणून गुरूंना निराकार असे म्हणतात.

आदेश

प्रसन्न संध्या प्रदीप कुलकर्णी

मी काय करू?

एकदा का अध्यात्मिक मार्गाला लागलो की माणसाला अनेकानेक रस्ते दिसू लागतात. इथे प्रत्येक गोष्टीला किंवा प्रश्नाला उत्तर आहे याची त्याला जाणीव होते. मग त्याला समजते की या मार्गात जेवढे करू तितके ते थोडे आहे. 
प्रत्येक साधनेचा वेगवेगळा अनुभव व परिणाम जीवनावर होत असतो. या मार्गात करोडो शुद्ध व सिद्ध मंत्र आहेत. अगदी मार्गतले अडचणी दूर करण्यापासून विविध सिद्धी मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे मंत्र आहेत. 
पण मग कोणत्या वेळी कोणती साधना करणे आवश्यक आहे ते काही केल्या समजत नाही. यासाठी सद्गुरू मार्गदर्शन आवश्यक असते. आपल्या भूत व भविष्यात होणाऱ्या गोष्टींना अनुरूप तेच आपल्याला साधना देऊ शकतात.
 
बरेचदा आपल्याला वाटते की मला ही साधना काही कामाची नाही किंवा यापेक्षा मी दुसरी साधना करतो म्हणजे माझी आताची गरज भागेल पण जर आपल्या साधनेला सद्गुरूंचा पाठिंबा नसेल तर आपली सद्गुरुप्रति शरणागती कमी आहे असे समजावे. अशा प्रकारे केली गेलेली साधना ही वाया तर जातेच पण त्यासोबत आपले भविष्यातील संकट जास्त गडद करून जाते. 

सद्गुरू शब्द प्रमाण मानून साधना करणे हेच या अध्यात्मिक मार्गातील यशाचे गमक राहिले आहे. तुम्हाला काय हवे आहे ते पाहून कदाचित सद्गुरू साधना नाही सांगणार पण तुमच्यासाठी काय योग्य आहे ते सदगुरु 100% सांगतील आणि हा विश्वास जोपर्यंत तुमच्यात रुजत नाही तोपर्यंत या अध्यात्मिक साधनेच्या समुद्रात आपण किनाऱ्यावरच आहोत असं समजावे. 
सरतेशेवटी मी काय करू हा स्वतःला विचारलेला विषयच या मार्गात चुकीचा आहे कारण या मार्गात कर्ता करविता सद्गुरु असतो. हा प्रश्न या मार्गात कधीच स्वतःला विचारू नका तो कायम सद्गुरू आणि आराध्य यांना विचारा आणि मग बघा यश व सुख कायम तुमच्या घरी नांदेल. 

आदेश
Pkul

Friday 23 April 2021

स्पंदन - भाग ३

*प्रश्न* - घरांतील स्पंदने जर अशुद्ध असतील, तर ते कसे ओळखावे ?

*उत्तर* - ज्या घरात अशुद्ध स्पंदने आहेत. त्या घरातील माणसांमध्ये वर वर्णन केलेले सर्व किंवा त्याहून अधिक दोष असतात. १) घरात शांती रहात नाही.  २) बरकत म्हणजे पुरवठा होत नाही. ३) घरातील लोक किरकिऱ्या - चिरचीऱ्या स्वभावाचे असतात. ४) घरातील माणसांची मने नेहमी अस्वस्थ व अशांत रहातात. ५) लहान मुलांना नेहमी आजारपण येते. ६) मुले चांगल्या स्वभावाची होत नाहीत. ७) घरातील प्रमुख जर या वातावरणाच्या पूर्ण अधीन गेलेला असेल म्हणजे त्याची स्पंदने जर पूर्णतः अशुद्ध झालेली असतील तर गृहप्रमुख व्यसनी, क्रोधी, अहंकारी व दुष्ट स्वभावाचा असतो. ८) एखादा सज्जन अशा घरात गेला तर, त्याला तत्काळ अस्वस्थता वाटू लागते. ही सारी गृह अशुद्ध असल्याची म्हणजे अशुद्ध वास्तूची लक्षणे आहेत. पुष्कळवेळा असेही पहावयास मिळते की वास्तू अशुद्ध आहे, गृहातील माणसे अशुद्ध स्पंदनलहरींची आहेत; पण त्यांच्यातीलच एखादी व्यक्ती फारच पवित्र आहे; पण याची कारणे वेगळी असतात. पुष्कळवेळा असेही दिसून येते की *वास्तु शुद्ध आहे* घरातील *एक* व्यक्ती अतिशय शुद्ध आहे पण बाकीचे अशुद्ध आहेत. याचे कारण ती एकच व्यक्ती साधनेने शुद्ध झालेली असते व  वास्तूमध्ये तिचा प्रभाव दिसून येतो; पण घरातील इतरांना याची कल्पनाच नसते. ते स्वतःच्या अशुद्धतेतच मस्त असतात. पण आशा घरातील ही पुण्यवान व्यक्ती निधन पावल्यावर काही दिवसातच वास्तू अशुद्ध होते. 

*प्रश्न -*  एखाद्या व्यक्तीने सोवळे किंवा स्पंदने अशुद्ध होऊ नयेत म्हणून काळजी केव्हापासून घ्यावी? व किती दिवस घ्यावी?

*उत्तर -* सर्व सामान्य माणसाने आचारविचार उच्च ठेवावेत. परमेश्वराची नम्रतेने भक्ती करीत राहावे. परोपकार दान-धर्म  करीत रहावे. प्रेमाने वागावे. 

वरील सर्व गोष्टी करीत असताना एकवेळ अशी येते की तुमची स्पंदने जास्त शुद्ध होतात. त्यावेळी अपवित्र माणसाचा स्पर्श किंवा दूर सहवासही तुम्हाला सहन होत नाही. अपवित्र स्पंदने तुम्हाला आपोआप कळू लागतात. प्रत्येक वास्तूमधील स्पंदनांचे ज्ञान तुम्हाला होऊ लागते. आपोआपच तुम्ही अपवित्र किंवा अशुद्ध स्पंदनलहरी असलेल्या गोष्टींपासून दूर जाऊ लागता. येथूनच तुम्ही सोवळे पाळण्यास सुरुवात केलेली असते. सोवळे पाळणे हे ढोंग नसून ती एक अवस्था आहे. या अवस्थेला तत्वज्ञानाच्या भाषेत *विशिष्टाद्वैत* म्हणतात. एकूण अवस्था तीन आहेत. मानवी मन आपोआपच या तीन अवस्था पार करते. 

*१) द्वैत अवस्था-* द्वैत म्हणजे अज्ञानाची, मूढपणाची अवस्था. या अवस्थेत चांगले वाईट काहीच कळत नाही. अहंकाराने मी (फक्त) चांगला, इतर दूषित इत्यादी प्रवृत्ती स्वभावात असतात. देव, मनुष्य व संत यातील फरक कळत नाही. ही अज्ञानरुपी द्वैत अवस्था. याची खूण डोळे मिटल्यावर दिसणारा अंधार.

*२) विशिष्टाद्वैत अवस्था-* परमेश्वरकृपेने मनुष्य ही द्वैतावस्था पार करून विशिष्टाद्वैत अवस्थेत प्रवेश करतो. यावेळी मनुष्याला चांगले काय व वाईट काय याचे ज्ञान होते. द्वैतअवस्थेतील अहंकार येथे बराच कमी झालेला असतो. स्पंदने अतिशय पवित्र व शुद्ध झालेली असतात. अशा व्यक्तीला जो भेद दिसतो तो चांगले वाईट यातला. आपले पावित्र्य सांभाळण्यासाठी तो नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात रहातो. वाईट म्हणजे अशुद्ध स्पंदने असलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहत नाही. तसेच अशुद्ध विचारांची गोष्ट करीत नाही. अशुद्ध वास्तु, अशुद्ध व्यक्ती, अशुद्ध विहार व अशुद्ध विचार, तो करीत नाही. या सर्वांपासून तो दूर रहातो; यालाच *विशिष्टाद्वैत* म्हणतात किंवा सोवळे पाळणे असे म्हणतात. 

हे सर्व कायमचे करायचे नसते तर पुढील प्रगती साध्य व्हावी त्यात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी करायचे असते; म्हणून सोवळ्याचा अभिमान म्हणजे "माझे सोवळे फारच कडक" वगैरे भावना मनात आणू नयेत, उलट हे लक्षात घ्यावे की या सर्व गोष्टी आपल्याला पथ्य म्हणून पाळावयाच्या आहेत किंवा उच्च कोटीची शुद्धावस्था प्राप्त करायची म्हणूनच पाळावयाच्या आहेत.

*३) अद्वैत अवस्था-* एकदा उच्चकोटीची शुद्धावस्था म्हणजे *अद्वैतावस्था* प्राप्त झाली की शुध्द व अशुद्ध हा भेद, चांगले वाईट हा भेद, पवित्र अपवित्र हा भेद, काहीच रहात नाही. *अद्वैतावस्था-* या अवस्थेत कसलाही भेदभाव रहात नाही. भक्त ईश्वरमय होतो. पवित्र- अपवित्र, चांगले - वाईट, सारे काही सम झालेले असते. तो चालता बोलता देव झालेला असतो. चराचरात त्याला परमेश्वरच दिसत असतो. कुणीही स्पर्श केला तरी तो अपवित्र होत नाही. स्त्री, पुरुष , चांगले - वाईट भक्त व निंदक, सारे काही त्याला सारखे झालेले असते.  तो सर्वातीत झालेला असतो. मित्र व शत्रू त्याला रहात नाहीत. 

मानवाचा परमार्थातील प्रवास ही अद्वैतावस्था प्राप्त करण्यासाठीच सुरू असतो. द्वैताकडून अद्वैताकडे जाताना वाटेतील महत्वाचा टप्पा  *विशिष्टाद्वैत* हा असतो.  द्वैत, विशिष्टाद्वैत अद्वैत या पायऱ्या किंवा अवस्था अनुभवीत अंती तो शून्यात किंवा चैतन्यात मिसळून जातो. सर्वत्र वास करणारे चैतन्य तो स्वतःच होतो. अर्थात आपण येथे द्वैत-अद्वैत या दोन्ही अवस्था सोडून फक्त विशिष्टाद्वैत म्हणजे चांगले घेऊन वाईट टाकायचे या अवस्थेचाच विचार करीत आहोत. 

विशिष्टाद्वैत अवस्थेत म्हणजे तुमच्या स्पंदनलहरी शुद्ध होऊ लागल्या की द्वैतावस्थेत असताना डोळे मिटल्यावर जो अज्ञान अंधकार दिसत होता तो दिसणे बंद होते. त्या ऐवजी प्रकाशाचे किरण दिसू लागतात. पुढे पुढे प्रकाशाच्या किरणात देवता व सिद्ध यांची स्पष्ट दर्शने होतात; म्हणजे आपण चित्ताकाशात प्रवेश केला, विशिष्टाद्वैत अवस्थेत प्रवेश केला हे समजावे, आपली स्पंदने बऱ्याच अंशी शुद्ध झालेली आहेत असे समजावे. स्पंदने अशुद्ध होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावयास सुरुवात करावी. जसजशी आपली स्पंदने शुद्ध होत जातात, तसतशी प्रसन्नता, सदगुण, सद् विचार यांची प्राप्ती होते. सद्गुण वाढू लागतात. जोपर्यंत स्पंदने अशुद्ध आहेत तोपर्यंत मन अस्वस्थ, अशांत व तर्क, वितर्क, कुतर्क करीत रहाते.  क्रोध, अहंकार, दुराग्रहिपणा, कुबुद्धी, मत्सर, द्वेष, वासना, दांभिकता व लोभ इत्यादी दुर्गुण हे अशुद्ध स्पंदनांमुळे निर्माण होतात.

Tuesday 20 April 2021

तन

सद्गुरूंना शरण तन मन धन या तिन्ही ने जावे असे म्हणतात.  यातील तन हा विषय म्हणजे आपले शरीर व त्याची कृती.. तन मन व धन या व्यतिरिक्त कोणतेच साधन अस्तित्वात नाही.. 

तन हे दृश्य वा अदृश्य असे कृती करण्याचे साधन आहे.. त्याची क्षमता बरेचदा मर्यादित असते.. पण खूप महत्त्वाची असते.. तनाने साथ दिल्यास असंभव सुद्धा संभव होऊ शकते.. एखादी साधना करायची म्हणाल्यास बैठक घेण्यासाठी तन हे प्राथमिक साधन आहे. खूप श्रम केलेले असल्यास तन साथ नाही देत.. थकवा आल्यास आपण अपेक्षित वेळ बैठक नाही घेऊ शकत.. त्यामुळे आपल्या तनाला तसे तयार करावे लागते.. उदा. लहान मुलाला चालण्यासाठी स्वतःच्या तनाला म्हणजे पायाला तयार करावे लागते मग एक एक पाऊल टाकायला तो शिकतो मग पळायला शिकतो तसेच आपण आपल्या शरीराला एखाद्या गोष्टीची सवय लावायला सुरुवात केल्यास ते त्याप्रमाणे तयार होते..   एखाद्या नवीन अध्यात्मिक क्षेत्रात आलेल्या माणसाला बैठक ही हळूहळू वाढवावी लागते पहिल्याच प्रयत्नात साडेतीन तास बैठक अशक्य आहे (सद्गुरू किंवा आराध्य कृपा नसल्यास अशक्य आहे असं).

 याचे अजून एक खूप सुंदर उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. ते एका वाचनालयात जात असत व मोठं मोठी पुस्तके एका दिवसात वाचून नवीन पुस्तके घेऊन जात असत. एकदा वाचनालयातल्या माणसाने त्यांना त्यांच्या वाचनाबद्दल विचारले तर त्यांनी अगदी पान क्रमांक सकट त्यांनी नेलेल्या पुस्तकातील मजकूर त्यांनी सांगितला.. म्हणजे आपण अशक्य सुद्धा सवयीने शक्य करू शकतो तसे आपल्याला आपल्या शरीराला प्रशिक्षित करता येते. 

जितेंद्रिय म्हणजे ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत तो काहीही करू शकतो. व्यायाम शाळेत लोक जातात तर ते आपल्या तनाची शक्ती वाढवायलाच ना? 

तनाची साथ असल्यास साधना करण्यास अडचण येत नाही.. झोप येत नाही, तहान लागत नाही, भूक लागत नाही माणूस त्या साधनेत लवकर प्रगती करतो. श्वासोच्छ्वास हे तनाचे कार्य आहे त्याद्वारे अजपाजप होणे हे सुद्धा साधनेचा प्रकार आहे.

आपली तनाची शक्ती आपणच मर्यादित ठेवतो. आज जे विश्वात नाव कमावणारे खेळाडू आहेत ते केवळ तनावार अमर्याद मेहनत घेऊन पुढे गेले आहेत. 

तनाची योग्य काळजी घेणे सुद्धा एक गरज आहे. आपण स्वतःला जपल्यास इतरांना आपला त्रास कमी होतो. प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते व ते जास्तीतजास्त कार्य करण्यालायक बनवणे आपल्या हातात आहे. सर सलामत तो पगडी पचास यानुसार राहावे. स्वतः सोबत आपल्या माणसांनाही जपावे. 

अध्यात्मिक दृष्ट्या जर आपण तनाने सद्गुरूंना शरण गेलो तर आपल्या प्रत्येक कृतीवर त्यांचे लक्ष राहते व येणारे भोग सहन करण्याची व त्याचा त्रास कमी करण्याची आपली शक्ती वाढते. साधना उत्तम होतात, प्रारब्धात नसलेल्या चांगल्या गोष्टी घडतात इ. अनेक फायदे होतात. मुळातच प्रत्येक जण इथे जाण्यासाठी आला आहे. मग मृत्यूचे वृथा भय कमी होते. मृत्यू हे अंतिम सत्य आहे पण तत्पूर्वी आपण आयुष्य जगणे व मोक्षप्राप्तीसाठी मेहनत घेणे हे कार्य शरीराने साथ दिल्यास व सद्गुरू मार्गदर्शनने उत्तम रित्या करता येते.  

Pkul

मनातले विचार आणि त्यांचा प्रभाव

मनाचे काम हे विचार करणे आहे. आपण केलेला विचार आणि त्याचा आपल्यावर प्रभाव याचा नक्कीच खूप जवळचा संबंध आहे... जसा आपण विचार करतो तसे आपल्याभोवती स्पंदने निर्माण होतात.. 

उदा. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी आपले मन तसा विचार करत असल्याने तशी स्पंदने निर्माण होऊन आपल्याला त्याची अनुभूती सुद्धा येते.

आपले विचार हे आपल्या भोवती स्पंदने निर्माण करण्याची शक्ति ठेवतात.. म्हणून आपल्याला कायम सांगितले जाते की अवघड परिस्थिती आली तरी सकारात्मक विचार करा.. तशी सकारात्मक स्पंदने ही परिस्थिती बदलण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. 

याउलट नकारात्मक विचार हे विपरीत शक्तींना आमंत्रित करत असल्याने त्यातून काही चांगल्या गोष्टी घडण्याचे प्रमाण कमी असते.. 

सकारात्मक विचार हे कोणालाही जीवनात यशस्वी करण्या कामी सहाय्य करतात. अवघड गोष्टीं साठी प्रयत्न करण्याची ऊर्जा देतात.. जितकेपण वैज्ञानिक शोध झालेत ते सकारात्मक प्रयत्न आणि सकारात्मक विचार करून कार्यप्राप्ती साठी कष्ट केल्याने झालेत.. अध्यात्मात जी जी साधना आपण करतो त्यातील मंत्र हे त्या दैवताचा विचार करण्यासाठी असतात.. त्यातून ती आपल्यासाठी कार्य करते.. म्हणून आपल्याला सांगितले जाते की  सकारात्मक विचार करा.. आपले मन हे सर्व प्रकारची विचार निर्मिती करते.. त्यामुळे आपल्याला सांगितले जाते की आपले मन हे आराध्याला अर्पण करा.. म्हणजे त्यातून आपले विचार कमी होतील व केवळ आराध्य निर्मित निर्मळ स्पंदने आपल्या भोवती तयार होतील.. सद्गुरुंचे निरंतर सान्निध्य पासून  ब्रह्मांड भेदन पर्यंत अनेक गोष्टी या मन व त्यातील विचार सद्गुरूंना दान केल्याने शक्य आहेत. पण याचा सुद्धा फार थोडा अभ्यास केला गेला आहे. 

वाईट बुद्धीचे तांत्रिक लोक हे बरेचदा आपले विचार ताब्यात घेण्याची क्षमता ठेवतात व त्यातील चांगली स्पंदने आकर्षित करून त्याची शक्ती त्यांच्या कामी वापरतात.. विचार हे एक शस्त्र आहे असं समजले तरी काही हरकत नाही तसेच विचार ही एक ढाल सुद्धा आहे.. मग ते आपण कसे वापरावे ते आपल्या हातात आहे. मनी वसे ते स्वप्नी दिसे.. काही स्वप्ने ही संकेत म्हणून पण येतात तर हे चक्र मनात तयार होते व सत्यात सुद्धा अवतरते. मन तारक असते तसेच मारक सुद्धा असते.. 

विचारपूर्वक विचार करा म्हणजे कृतीत दिसेल.


Pkul

धन


तन व मन यांच्या मुळे धन निर्माण होते म्हणून या साखळीत ते सर्वात शेवटी आहे.. धन हे कोणत्याही स्वरूपाचे असू शकते. व ते दान करण्यासारखे असते..

द्रव्य असो किंवा अध्यात्मिक संपत्ती असो धन हा विचार आणि कृती यांचे अंतिम स्वरूप (साधन) आहे. आपण कमावलेले नाव, साधनेत प्रसन्न झालेले दैवत हे सुद्धा तर धनच आहे. 

काहीही केले तरी काय कमावले यास महत्त्व आहे. त्यातून आपली मेहनत दिसते. 

धनाचा वापर करणे सुद्धा योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे.

उदा. महिन्याला आपण जे द्रव्य कमावतो ते आधी आपल्या अत्यावश्यक गरजांना वापरणे व त्यानंतर थोडी बचत व त्यातून काही उरल्यास चैन करायला खर्च करणे महत्वाचे आहे.. आपण चैन करायला पाहिले सुरुवात केली तर आपल्या मुख्य गरजा दुर्लक्षित राहतील. 

धन हे संपण्यासाठीच असते. आपल्याला मिळालेले आयुष्य हे सुद्धा धन आहे. जे खर्च होते आहे..  मग त्याचा वापर कसा करायचा ते आपल्या हातात आहे. योग्य तन व मन चा वापर केल्यास या आयुष्याला योग्य आकार येतो. जन्माला आला आणि पाणी वाहून मेला अशी आपली गत होण्यापेक्षा विधायक कार्यात आपले आयुष्यरूपी धन वापरले तर तेवढिच पुण्यप्राप्ती होऊन मोक्षप्राप्ती साठी वाट सुकर होईल. योग्य सद्गुरू मार्गदर्शन हे यासाठीच महत्वाचे असते.  

आपले आयुष्य हे खूप गुंतागुंतीच विशाल चक्र आहे. सुख दुःख व भावना हे मनाचे खेळ आहेत. पण आपले आयुष्यच आपलं सर्वात मोठं धन आहे. व त्याचा योग्य वापर करावा हेच महत्वाचे. 

प्रसन्न संध्या प्रदीप कुलकर्णी

Sunday 4 April 2021

नैवेद्य



साधना असो आरती असो किंवा सेवा असो नैवेद्य हे देवाला देण्यामागे फार छान असे शास्त्र आहे. फार कमी अशा गोष्टी आहेत को ज्या आपण देवाला देऊ शकतो त्यातली नैवेद्य ही गोष्ट अतिशय सोपी आणि खास आहे. 

साधना करतेवेळी नैवेद्य दाखवताना काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे असते. 
१. आपण दाखवलेला नैवेद्य हा आपण खाऊ शकू असा असावा.. 
२. शिळा नसावा
३. दैवताला आवडणाऱ्या नैवेद्याची माहिती आधी करून घेणे हितावह असते.
४. कुलदैवत व आराध्य याना दाखवलेला नैवेद्य सोडला तर बाकी कोणत्याही साधनेचा नैवेद्य खाऊ नये. 
५. गायीला खायला द्यावा किंवा त्या त्या दैवतेचे जे कोणी प्रतीक असेल त्यास खाऊ घालावा.
६. नैवेद्य हा थोडाच दाखवावा. उगीच वाया जाईल असे काही करू नये.

नैवेद्य दाखवताना आपण त्या दैवताला खाऊ घालत असल्याची भावना मनात असावी. शक्य तितक्या कोमल भावनेने नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य दाखवल्यावर ५ मिनिट थांबून मनात ते दैवत आपण दाखवलेला नैवेद्य ग्रहण करत असल्याची भावना ठेवावी. 

साधना झाली की लगेचच नैवेद्य उचलून घ्यावा. आपण देऊ शकतो अशा फार कमी गोष्टी आहेत त्यात नैवेद्य हा अग्रभागी आहे. आपल्या हाकेला धावणाऱ्या दैवताप्रति आपण केलेल्या सेवेव्यतिरिक्त नैवेद्य हीच गोष्ट थेट जाते. नैवेद्य दाखवताना आपल्या इच्छा त्या दैवताला सांगू नयेत. त्या सांगायला संकल्प पुरेसा असतो. केवळ आणि केवळ देण्याच्या भावनेने नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यसोबत थोडे पाणी सुद्धा ठेवावे व नन्तर ते झाडाला टाकावे. 
*टीप- या सर्व गोष्टी फक्त साधना करताना दाखविल्या जाणाऱ्या नैवेद्य पुरत्याच मर्यादित आहेत.*

प्रसन्न संध्या प्रदीप कुलकर्णी

Thursday 1 April 2021

स्थान

साधनेसाठी बसताना आपले स्थान खूप महत्वाचे असते. कारण तिथे आपण आपल्या साधना दैवत सोबतच आराध्य दैवत सुद्धा आमंत्रित करतो. ती जागा जितकी शुद्ध व चांगली असेल तितक्या वेळ साधना दैवत आपल्या सोबत थांबते. यात सुद्धा निर्माण होणारी स्पंदने ही लवकर तयार होतात. एखाद्या मंदिरात केलेली साधना ही जास्त लवकर फलदायी होते कारण तिथे आधीच्या साधकांनी केलेली साधना व पूजा यामुळे ती स्पंदने आधीपासूनच असतात.. व लवकरच ती आकर्षित होतात.
उदा. जर गणपती मंदिरात आपण गणपती साधना केली तर तेथील आधीच्या साधकांनी केलेल्या साधनेची स्पंदने व आपल्या साधनेतील तरंग एकत्र होऊन एक वेगळी प्रभावी शक्ती तयार होते. व साधनेचे इच्छित फलित लवकर प्राप्त होते किंवा साधना लवकर साध्य होते.

आता काही साधकांना सिद्धी प्राप्त असते व ते कोणत्याही जागी बसून साधना करताना सिद्धी द्वारे साधना दैवत आहे तिथे जाऊ शकतात. 


पण सर्वांना हे शक्य नसते अशा वेळी आपण आपले साधनेचे ठिकाण हे कसे शुद्ध असावे किंवा आपल्या साधना दैवतच्या जास्तीत जास्त कसे जवळ असावे हे पाहणे महत्वाचे आहे. साधनेची जागा ही कशी असावी ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे.. 
 आपले देवघर आपण जास्तीत जास्त स्वच्छ ठेवणे, नित्यनेमाने फुले इतर गोष्टी बदलणे तसेच दाखवलेला नैवेद्य इ गोष्टी यांची नन्तर साफसफाई करणे यातून त्या स्थानाची स्पंदने निर्माण करण्याची शक्ती वाढते. आपण बसल्यावर लावलेला धुपचा सुगंध तसेच दीप सुद्धा स्पंदन निर्माण करण्याची ऊर्जा देतो. थोडक्यात साधना ही स्पंदननिर्मिती आहे व ती करताना जास्तीत जास्त प्रभावी होण्यासाठी स्थान व इतर वातावरणचा होणारा परिणाम खूप महत्वाचा आहे. 

साधनेचे खूप प्रकार आहेत त्यात
१. एकांत साधना
२. समूह साधना
३. गुरुपरिवारासोबत साधना
४. सदगुरूसह केलेली साधना
५. विशिष्ट कार्यप्राप्ती साठी केलेली साधना इ.

तांत्रिक लोक हे गुप्त ठिकाणी साधना करतात कारण त्या ठराविक स्थानी त्यांना ती स्पंदने मिळाली असतात व साधना कित्येक पटीत फलदायी होते. 
पण या सर्वात सद्गुरू मार्गदर्शन खाली निवडलेल साधना स्थान हे सर्वोत्तम असते. त्यांच्या सांगण्यावरून केलेली साधना ही कुठेही फलदायी असतेच. त्या साधना दैवतला आपल्या साधना स्थळी यावच लागत.  कारण गुरुस्पंदने ही सर्वोच्च स्पंदने आहेत (हीच शिवशक्ती स्पंदने आहेत).. ती जेव्हा साधनेत मिसळतात तेव्हा साधना दैवतच काय तर संपूर्ण विश्वातील शक्ती त्वरित तेथे येते. 
त्यामुळे सद्गुरू सांगतील तेथे निःशंक मनाने व निडरतेने साधना करावी. 
याऊलट तुम्हाला लाख सिद्धी प्राप्त झाली आणि सद्गुरूंनी एखाद्या ठिकाणी साधना करू नये असं सांगितलं तर तेथे साधना करू नये कारण भले साधना दैवतच काय तर मूळ शक्ती जरी तिथे समोर जरी आली तरी ती साधना फलद्रूप होत नाही..

 
आदेश🙏🏻

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...