Friday 23 April 2021

स्पंदन - भाग ३

*प्रश्न* - घरांतील स्पंदने जर अशुद्ध असतील, तर ते कसे ओळखावे ?

*उत्तर* - ज्या घरात अशुद्ध स्पंदने आहेत. त्या घरातील माणसांमध्ये वर वर्णन केलेले सर्व किंवा त्याहून अधिक दोष असतात. १) घरात शांती रहात नाही.  २) बरकत म्हणजे पुरवठा होत नाही. ३) घरातील लोक किरकिऱ्या - चिरचीऱ्या स्वभावाचे असतात. ४) घरातील माणसांची मने नेहमी अस्वस्थ व अशांत रहातात. ५) लहान मुलांना नेहमी आजारपण येते. ६) मुले चांगल्या स्वभावाची होत नाहीत. ७) घरातील प्रमुख जर या वातावरणाच्या पूर्ण अधीन गेलेला असेल म्हणजे त्याची स्पंदने जर पूर्णतः अशुद्ध झालेली असतील तर गृहप्रमुख व्यसनी, क्रोधी, अहंकारी व दुष्ट स्वभावाचा असतो. ८) एखादा सज्जन अशा घरात गेला तर, त्याला तत्काळ अस्वस्थता वाटू लागते. ही सारी गृह अशुद्ध असल्याची म्हणजे अशुद्ध वास्तूची लक्षणे आहेत. पुष्कळवेळा असेही पहावयास मिळते की वास्तू अशुद्ध आहे, गृहातील माणसे अशुद्ध स्पंदनलहरींची आहेत; पण त्यांच्यातीलच एखादी व्यक्ती फारच पवित्र आहे; पण याची कारणे वेगळी असतात. पुष्कळवेळा असेही दिसून येते की *वास्तु शुद्ध आहे* घरातील *एक* व्यक्ती अतिशय शुद्ध आहे पण बाकीचे अशुद्ध आहेत. याचे कारण ती एकच व्यक्ती साधनेने शुद्ध झालेली असते व  वास्तूमध्ये तिचा प्रभाव दिसून येतो; पण घरातील इतरांना याची कल्पनाच नसते. ते स्वतःच्या अशुद्धतेतच मस्त असतात. पण आशा घरातील ही पुण्यवान व्यक्ती निधन पावल्यावर काही दिवसातच वास्तू अशुद्ध होते. 

*प्रश्न -*  एखाद्या व्यक्तीने सोवळे किंवा स्पंदने अशुद्ध होऊ नयेत म्हणून काळजी केव्हापासून घ्यावी? व किती दिवस घ्यावी?

*उत्तर -* सर्व सामान्य माणसाने आचारविचार उच्च ठेवावेत. परमेश्वराची नम्रतेने भक्ती करीत राहावे. परोपकार दान-धर्म  करीत रहावे. प्रेमाने वागावे. 

वरील सर्व गोष्टी करीत असताना एकवेळ अशी येते की तुमची स्पंदने जास्त शुद्ध होतात. त्यावेळी अपवित्र माणसाचा स्पर्श किंवा दूर सहवासही तुम्हाला सहन होत नाही. अपवित्र स्पंदने तुम्हाला आपोआप कळू लागतात. प्रत्येक वास्तूमधील स्पंदनांचे ज्ञान तुम्हाला होऊ लागते. आपोआपच तुम्ही अपवित्र किंवा अशुद्ध स्पंदनलहरी असलेल्या गोष्टींपासून दूर जाऊ लागता. येथूनच तुम्ही सोवळे पाळण्यास सुरुवात केलेली असते. सोवळे पाळणे हे ढोंग नसून ती एक अवस्था आहे. या अवस्थेला तत्वज्ञानाच्या भाषेत *विशिष्टाद्वैत* म्हणतात. एकूण अवस्था तीन आहेत. मानवी मन आपोआपच या तीन अवस्था पार करते. 

*१) द्वैत अवस्था-* द्वैत म्हणजे अज्ञानाची, मूढपणाची अवस्था. या अवस्थेत चांगले वाईट काहीच कळत नाही. अहंकाराने मी (फक्त) चांगला, इतर दूषित इत्यादी प्रवृत्ती स्वभावात असतात. देव, मनुष्य व संत यातील फरक कळत नाही. ही अज्ञानरुपी द्वैत अवस्था. याची खूण डोळे मिटल्यावर दिसणारा अंधार.

*२) विशिष्टाद्वैत अवस्था-* परमेश्वरकृपेने मनुष्य ही द्वैतावस्था पार करून विशिष्टाद्वैत अवस्थेत प्रवेश करतो. यावेळी मनुष्याला चांगले काय व वाईट काय याचे ज्ञान होते. द्वैतअवस्थेतील अहंकार येथे बराच कमी झालेला असतो. स्पंदने अतिशय पवित्र व शुद्ध झालेली असतात. अशा व्यक्तीला जो भेद दिसतो तो चांगले वाईट यातला. आपले पावित्र्य सांभाळण्यासाठी तो नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात रहातो. वाईट म्हणजे अशुद्ध स्पंदने असलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहत नाही. तसेच अशुद्ध विचारांची गोष्ट करीत नाही. अशुद्ध वास्तु, अशुद्ध व्यक्ती, अशुद्ध विहार व अशुद्ध विचार, तो करीत नाही. या सर्वांपासून तो दूर रहातो; यालाच *विशिष्टाद्वैत* म्हणतात किंवा सोवळे पाळणे असे म्हणतात. 

हे सर्व कायमचे करायचे नसते तर पुढील प्रगती साध्य व्हावी त्यात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी करायचे असते; म्हणून सोवळ्याचा अभिमान म्हणजे "माझे सोवळे फारच कडक" वगैरे भावना मनात आणू नयेत, उलट हे लक्षात घ्यावे की या सर्व गोष्टी आपल्याला पथ्य म्हणून पाळावयाच्या आहेत किंवा उच्च कोटीची शुद्धावस्था प्राप्त करायची म्हणूनच पाळावयाच्या आहेत.

*३) अद्वैत अवस्था-* एकदा उच्चकोटीची शुद्धावस्था म्हणजे *अद्वैतावस्था* प्राप्त झाली की शुध्द व अशुद्ध हा भेद, चांगले वाईट हा भेद, पवित्र अपवित्र हा भेद, काहीच रहात नाही. *अद्वैतावस्था-* या अवस्थेत कसलाही भेदभाव रहात नाही. भक्त ईश्वरमय होतो. पवित्र- अपवित्र, चांगले - वाईट, सारे काही सम झालेले असते. तो चालता बोलता देव झालेला असतो. चराचरात त्याला परमेश्वरच दिसत असतो. कुणीही स्पर्श केला तरी तो अपवित्र होत नाही. स्त्री, पुरुष , चांगले - वाईट भक्त व निंदक, सारे काही त्याला सारखे झालेले असते.  तो सर्वातीत झालेला असतो. मित्र व शत्रू त्याला रहात नाहीत. 

मानवाचा परमार्थातील प्रवास ही अद्वैतावस्था प्राप्त करण्यासाठीच सुरू असतो. द्वैताकडून अद्वैताकडे जाताना वाटेतील महत्वाचा टप्पा  *विशिष्टाद्वैत* हा असतो.  द्वैत, विशिष्टाद्वैत अद्वैत या पायऱ्या किंवा अवस्था अनुभवीत अंती तो शून्यात किंवा चैतन्यात मिसळून जातो. सर्वत्र वास करणारे चैतन्य तो स्वतःच होतो. अर्थात आपण येथे द्वैत-अद्वैत या दोन्ही अवस्था सोडून फक्त विशिष्टाद्वैत म्हणजे चांगले घेऊन वाईट टाकायचे या अवस्थेचाच विचार करीत आहोत. 

विशिष्टाद्वैत अवस्थेत म्हणजे तुमच्या स्पंदनलहरी शुद्ध होऊ लागल्या की द्वैतावस्थेत असताना डोळे मिटल्यावर जो अज्ञान अंधकार दिसत होता तो दिसणे बंद होते. त्या ऐवजी प्रकाशाचे किरण दिसू लागतात. पुढे पुढे प्रकाशाच्या किरणात देवता व सिद्ध यांची स्पष्ट दर्शने होतात; म्हणजे आपण चित्ताकाशात प्रवेश केला, विशिष्टाद्वैत अवस्थेत प्रवेश केला हे समजावे, आपली स्पंदने बऱ्याच अंशी शुद्ध झालेली आहेत असे समजावे. स्पंदने अशुद्ध होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावयास सुरुवात करावी. जसजशी आपली स्पंदने शुद्ध होत जातात, तसतशी प्रसन्नता, सदगुण, सद् विचार यांची प्राप्ती होते. सद्गुण वाढू लागतात. जोपर्यंत स्पंदने अशुद्ध आहेत तोपर्यंत मन अस्वस्थ, अशांत व तर्क, वितर्क, कुतर्क करीत रहाते.  क्रोध, अहंकार, दुराग्रहिपणा, कुबुद्धी, मत्सर, द्वेष, वासना, दांभिकता व लोभ इत्यादी दुर्गुण हे अशुद्ध स्पंदनांमुळे निर्माण होतात.

1 comment:

  1. स्पंदने , मानवी मनाच्या अवस्था ह्याविषयी अप्रतिम विवेचन. खुप खुप धन्यवाद नंदेश नथजी

    ReplyDelete

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...